जास्त वेळ बाहेर नको राहत जाऊ. काम झाल कि, लगेच घरी येत जा. आपण कितीही चांगल असलं तरी कोणाचा काही भरोसा नाही ग बाई..
काल हैदराबाद मध्ये घडलेली घटना आईला सांगितल्या नंतर मला अपेक्षित असणार वाक्य कानी पडल.
आता जास्त वेळ बाहेर नको राहत जाऊ म्हणजे नेमका किती आणि कोणता वेळ माझ्यासाठी सुरक्षित आहे? याचा अंदाज सध्या तरी मला आला नाही. कारण काही दिवसांपूर्वीच क्रांती चौक सारख्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा नको अशा प्रसंगाचा अनुभव आला.
संध्याकाळी पावणेसातच्या दरम्यान कॉलेज मधून घरी शांततेत विचार करत पायी जात असताना, अचानक समोरुन गाडीवरून आलेल्या दोघांमधून एकाने " ऐ छीनाल आती क्या?" म्हणत माझ्या शांततेचा गळा घोटला. (घरी सत्यनारायनाच्या पूजेला येण्याचे निमंत्रण नव्हत हे.) त्याच क्षणी ज्यांचा अर्थ माहित आहे आणि नाही सुद्धा त्या सगळ्या शिव्या तोंडून बाहेर पडल्या. आणि अचानक कोणीतरी डिवचवल्याने आजूबाजूने जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला काय घडतय, याचा सहज स्पष्ट अंदाज येईल अशा आवाजात माझा राग मर्यादा ओलांडत होता. तरीदेखील त्या वेळी ना एखादी व्यक्ति थांबली ना कोणी काय होतय हे जाणून घेण्याची तसदी घेतली.
चढता आवाज आणि संताप बघत त्या दोघांपैकी एकाने 'जाने दो ना' म्हणत तिथून काढता पाय घेतला.
आता नेमक काय जाऊ देऊ मी? माझी कोणतीही चुक नसताना ऐकाव्या लागलेल्या त्या शब्दांना?
की केवळ वासना असणाऱ्या त्या नजरेला?
हा तोच क्रांती चौक होता जिथून अत्याचार पिडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न भुतो न भविष्यतो असा मोर्चा काढण्यात आला होता. आणि आज त्याच वरवर सुरक्षित वाटणाऱ्या माझ्या या शहरात रोज अशा प्रसंगांचा, चौका- चौकात होणारा त्रास, रिक्षावाल्यांची मग्रूरी, अश्लील शेरे, वासनेने डबडबलेल्या नजरांचा सामना अनेकिंना करावा लागतो.
फक्त काही घडल्यावरच मेणबत्या घेऊन मोर्चे काढले, स्टेटस, प्रोफाईल मध्ये पीडितेचा फोटो ठेवला, RIP अन We want justice असे हैशटैग पोस्ट केले, की आपली जबाबदारी पार पडली अस समजायचे.
फाशी दया,भर चौकात जाळुन टाका यांना, चौरंगा करा, अशा अनेक मागण्या या दरम्यान करण्यात येतात. पण जिवानीशी मारल तर खरंच बलात्काराची मानसिकता देखील त्याच क्षणी मरण पावते का?
कोणत्याही मुलीला तिच्या कुटुंबाला या मागण्या, मोर्चे नको तर केवळ उत्तर हवंय. घराबाहेर पडल्यानंतर तिला सुरक्षित वातावरणात जगता येईल का?
घरी ती सुखरूप पोहचेल की तिच्या आई- वडिलांना कुठे एखाद्या कोपऱ्यात जळलेल्या अवस्थेत सापडेल?
Bharich
ReplyDeleteहा लेख आवडला असं कुठल्या शब्दांत सांगू. तरीही एक भयावह वास्तव समोर आणणारा हा लेख आहे.
ReplyDelete