चित्रपट हे
माध्यम नुसतेच करमणुकीचे माध्यम नाही तर ते प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अत्यंत
प्रभावी माध्यम आहे. चित्रपट दिग्दर्शक आपल्या कलाकृतीद्वारे लेखकाच्या कथेमध्ये
त्याला जाणवलेला अनुभव प्रेक्षकांना देऊ पाहत असतो. एमजीएम मिशन, नाथ ग्रुप व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान द्वारे गेल्या ५ वर्षांपासून औरंगाबाद
आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
केले जात आहे. आणि त्या निमित्ताने शहरातील चित्रपट रसिकांना उत्कृष्ट दर्जाचे आणि
सामाजिक आशय असणारे विविध
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील चित्रपटांचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी लाभत
आहे. नेहमीचे आणि तेच ते आशयहीन चित्रपटांचा समावेश न करता विविध अस्पर्शित विषय आणि
वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा समावेश असल्याने हा महोत्सव लक्षवेधी ठरत आहे.
यंदाचा ६
वा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा ९ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित
करण्यात आला. आणि या कालावधीत एकूण ३५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट
त्याबरोबरच २० शॉर्टफिल्मस प्रदर्शित करण्यात आले.पावेल पावलिकोवस्की
दिग्दर्शित ‘कोल्ड वॉर’ या चित्रपटाच्या
प्रदर्शनाणे महोत्सवाचा आरंभ करण्यात आला. मंटो, न्यूड, घटश्रद्धा, आरोन, जोहार माय बाप, द सेव्हन्थ सील, अब्बु, वाइल्ड
स्ट्राबेरीस, बॅड पोयेट्री टोकयो असे अनेक चित्रपट आणि 15 ऑगस्ट, कविता, तरंग इ. विविध शॉर्टफिल्मसचा समावेश या महोत्सवामध्ये
करण्यात आला.
एकसूरी तसेच
साचेबद्ध चित्रपट पाहून कंटाळलेल्या रसिकांसाठी
हा महोत्सव पर्वणीच ठरला. चित्रपट, त्यात उलगडणारी कथा, त्याचे चित्रण हे तत्कालीन समाजातील विविध घटकांचे दर्शनच घडवते. अनेक अस्पर्शित
विषयांवरील चित्रपट दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहताना त्यातील आशय, वास्तविकता, करुणा हे सारेच विचार करण्यास भाग पाडतात.बहुतांश वेळा
एखाद्या पुस्तकात किंवा रेडिओ वरील कार्यक्रमात नाव ऐकून ज्यांच्याविषयी मनात एक वेगळेच
कुतहुल निर्माण झाले त्या सआदत हसन मंटोंची जीवनरेषा नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेल्या
‘मंटो’ या चित्रपटात अनुभवता आली. नवाजूद्दीन सारख्या
ताकदीच्या अभिनेत्याने साकारलेला मंटो हा क्षणभर देखील कृत्रिम भासला नाही. उलट अभिनय, आवाज, संवादातील चढ-उतार, उर्दू-हिंदी
भाषेचा साधलेला सुंदर मिलाफ प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. त्याचबरोबर रसिका डूग्गल, राजश्री देशपांडे यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखातून त्यांची अभिनयावरील पकड
सहज लक्षात येते. खास करून राजश्रीने केलेली इस्मत चुगताईची भूमिका थेट मनाला भिडते.
तिच्या वागण्यातल्या मोकळेपणा, हावभाव,
बोलण्यातील लय प्रेक्षकांसमोर खरीखुरी इस्मत चुगताई जिवंत करते. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच
नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाचे देखील कौतुक. मंटोचे जीवन ठराविक साच्यात न मांडता
त्यांनी लिहलेल्या कथा, त्याचे चित्रण,
मंटोच खर जगणं हे सार यात उत्कृष्ट पद्धतीन मांडलेलं दिसते.
१४ राष्ट्रीय
पुरस्कार प्राप्त कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचा ‘घटश्रद्धा’ चित्रपट पाहण्यास रसिकांनी मोठी गर्दी केली.
समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर बोट ठेवणार्या या चित्रपटात ‘नानी’ या बटु आणि ‘यमुनाक्का’ या विधवेची कथा गुंफली गेली आहे. तर या शतकातील महान दिग्दर्शक म्हणून ज्यांना
ओळखले जाते त्या स्वीडिश दिग्दर्शक इग्मार बर्जमन यांच्या ‘द
सेव्हन्थ सील’ या चित्रपटात अटळ सत्य असलेल्या मृत्युला टिपण्यात
आले आहे. तसेच मृत्युसोबत बुद्धिबळ खेळणारा योद्धा दाखवून मृत्युलाच थेट आव्हान यात
दिलय.असे विविध आशयसंपन्न चित्रपट
या महोत्सवामध्ये दाखवण्यात आले. मात्र हा महोत्सव लक्षवेधी ठरला तो चित्रपट प्रदर्शनानंतर त्या-त्या
चित्रपटांचे दिग्दर्शक, कलाकार यांनी रसिकांशी साधलेल्या संवादामुळे.
त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आल्यानेच प्रेक्षकांना देखील वेगळा अनुभव घेता आला.
आणि चित्रपटांनाबरोबरच युवकांनी बनविलेल्या शॉर्टफिल्म्सचा समावेश सुद्धा महोत्सवात
असल्याने मुलांच्या सृजनशीलतेला जागा देणारे उत्तम व्यासपीठ म्हणून देखील हा चित्रपट
महोत्सव पुढे येत आहे. आणि त्यामुळेच शहराच्या वैचारिक व सांस्कृतिक जडणघडणीत हा महोत्सव
मोलाची भर घालत आहे...
No comments:
Post a Comment