‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ हा मंत्र आमच्या पिढय़ापिढय़ांना पाठ आहे, ‘महिला हक्क हाच मानवी हक्क’ असा नाराही आम्ही देत असतो. नारीहक्काच्या घोषणा दुमदुमत असतात. स्त्री जातीचा आदर आम्ही कसं करतो हे इतरांना दाखवणं तर कायमचच. आमच्या संस्कृतीत स्त्री जातीला पूज्य मानले जाते. स्त्री ही शक्तीचे प्रतीक आहे, असे आम्ही ओरडून जगाला सांगतो. पण स्त्री ही अबला आहे, आणि तिच्यावर अधिकार गाजवण हा जणू मूलभूत अधिकारच हेही आपणच ठरवलेल . कारण त्यामुळेच तिच्या सबलीकरणाचे असंख्य प्रयोग राबवत आम्हाला राजकारणही करावे लागते. स्त्री हा आमच्याकडे आदराचा, विनोदाचा आणि पदद्यामागचा विषय आहे. या बाबतीत खरा चेहरा कोणता आणि बुरखा कोणता हे जगाला ओळखूदेखील येणार नाही एवढय़ा सराईतपणे आपण वावरतो.
तसे बघितले, तर भारतात महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पुरातन काळापासून पूजनीय मानले गेलेले आहे. त्याच वेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार व विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते. असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात आणि अशा वेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभ्या राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरवात करतो; पण याच वेळी प्रश्न समोर उभा राहतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का?
समाज सातत्याने बदलत असतो. त्या बदलाचे पडसाद महिलांच्याही जीवनमानावर होत असतात. आणि त्यातून त्यांची भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टिकोन यामध्येही मोठा बदल होत आहे. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे, त्यांच्या अधिकारांकडे, व्यक्तिस्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अजूनही संकुचितच आहे. काळाच्या बरोबर चालायचे म्हणून मुलींना शिकवणार्या पालकांची संख्या तर वाढतीय मात्र उच्चशिक्षण घेऊनही किती जणी मनाप्रमाणे काम, नौकरी करतात हा तसा संशोधनाचा विषय. कारण शिकलेल्या मुली तर हव्यात पण फक्त घराची शोभा वाढवण्यापूरत्याच आणि जरी बाई नौकरी करणारी असली तरी सर्वप्रथम घरातली काम पूर्ण करावी अन ७ च्या आत घरात अशा अटी तिच्या माथी मारलेल्याच. त्यामुळे दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हे प्रश्न मांडणारे, त्यावर उपाय सुचविणारे, उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देणारे महिलांप्रमाणेच पुरुषही आहेतच, हे वास्तव असूनही ही वैचारिकता समाजातील काहीच पुरुषांमध्ये असल्याचे आढळते. अधिकार गाजवणारी पुरुषी मानसिकता बदलायची असल्यास महिला सक्षमीकरणाची चळवळ ही तळागाळापर्यंत पोहोचलीच पाहिजे. केवळ नारीशक्ति, स्त्री सबलिकरणच्या गप्पा मारण आणि सोशल मीडिया वर महिलादिंनाच्या दिवशी भावनिक पोस्ट करून कोणतीही बाई सक्षम होणार नाही आणि मुळातच ती सक्षमा आहे फक्त गरज आहे ती आपले चौकटिबद्ध विचार बाजूला करण्याची.
No comments:
Post a Comment