Sunday, April 7, 2019

देवदासी... की भोगदासी?


                      भावीण, बसवी, ‘जोगतिणी, मुरळी आणि देवदासी अशा अनेक नावानी देवाची सेविका अथवा पत्नी म्हणून जीवन जगणाऱ्या बाईला ओळखले जाते. जेव्हा संस्थानं, राजवाडे अस्तित्वात होती तेव्हा त्यांच्या भागातील मंदिरांना ठराविक रक्कम वा जमिनी खर्चासाठी दिल्या जाई. तसेच त्या मंदिरात सेवा करणाऱ्या स्त्रीया या नाच- गाणे यात देखील निपुण होत्या. देवाच्या नावाखाली तेव्हा सुद्धा त्यांना राजे-महाराजे तथा धनिकाकडून उपभोगलं जाई.     
प्राचीन काळापासून सुरु असलेल्या या प्रथेचे प्रमाण काही अंशी कमी झालं असलं तरी आजतागायत हि प्रथा सुरूच आहे.  आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात.रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळय़ा वाहिल्या जातात.  बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे डोंगरावर यल्लम्मा देवीचं मंदिर आहे. आणि याच  यल्लम्मादेवीच्या जत्रेत देवदासीपणाची दीक्षा दिली जाते. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक मार्गशीर्ष पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या काळात देवीच्या दर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला ‘रांडाव पुनव’ तर पौष पौर्णिमेला ‘आहेव पुनव’ म्हणतात. शिवाय चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा असते. ती १५ दिवस चालते. या काळात यल्लम्माला सोडलेल्या जोगतिणी आणि जोगते (पुरुष) विशिष्ट कर्मकांड पार पाडत असतात. तसेच याच  यल्लम्मा देवीसमोर नग्नपूजेची अघोरी प्रथादेखील पाळण्यात येते.   मुला-मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट . मुलां-मुलींना  खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळय़ा बनवतात. आई-वडिलांनी देवाला मागितलेला नवस पूर्ण झाल्यानंतर मुलीला देवाला सोडले जाते, किंवा देवासोबत तिचे लग्न लावून दिले जाते. जास्त गाजावाजा न होता , एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. त्यानंतर आयुष्यभर त्यांना तसेच राहावे लागते. या दरम्यान त्यांचे शारीरिक शोषण आणि त्यांच्यावर अत्याचार होत असतात. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी ही पैसा कमविण्याची एक संधी या गरीबांना मिळते. त्यामुळे  ही अंधश्रद्धा इथे असली तरी खरं कारण हे आर्थिक आहे.
देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं.  देवदासी प्रथेमध्ये मुलीला वयात येण्यापूर्वी देवाला सोडून कोवळय़ा वयातच त्यांचे भवितव्य ठरविले जाते. तेही तिच्या जन्मदात्याकडूनच ! विशेष म्हणजे  ज्या ठिकाणी अशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी त्याचे प्राबल्य जास्त जाणवते. देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. दारिद्रय़ात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचणार्या दलित देवदासी कोणतीही तक्रार न करता उत्सवात भाग घेतात. त्याबद्दल त्यांना मिळणारी साडीचोळी, नारळसुपारी यातच त्या समाधान मानतात.देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिच्यापुडे येत.  स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही. या प्रथेस धार्मिक आणि सामाजिक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसते.
देवदासी प्रथेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आजपर्यंत अनेकवेळा आवाज उठविला याचे मुख्य कारण म्हणजे या अनिष्ट प्रथेमुळे वेश्या व्यवसायाला खतपाणी तर मिळतच पण त्यासोबतच स्त्रीयांची कुचंबणा देखील होते. विसाव्या शतकात त्याविरुद्ध अनेक लढे झाले, चळवळी झाल्या तरी तिचे समूळ उच्चाटन झालेले नाही. अनेक आंदोलनानंतर कर्नाटक सरकारने 1982 आणि आंध्रप्रदेश सरकारने 1988 मध्ये ही प्रथा बेकायदेशीर ठरवली. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील स्वरुप जरी बदललेले असले तरी मूळ प्रथेशी निगडित जे उत्सव अथवा प्रथा आणि परंपरा आहेत त्या तशाच आहेत. शिवाय मुक्त झालेल्या देवदासींच्या शिक्षणाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्नही जटिल असतो. उपजीविकेचे स्थिर साधन मिळाले नाही तर या स्त्रिया पुन्हा त्याच मार्गाला लागण्याचा धोका असतो. 
आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दीक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने गलिच्छ दरीत दूर लोटून देते ती परत कधीही वर न येण्यासाठी ! आणि हे चक्र इथेच थांबत नाही, तर सुरू होते. एखाद्या घरात ही प्रथा सुरू झाल्यावर त्यात खंड पडू दिला जात नाही. आणि देवदासी असणार्‍या बाईला होणारी मुलगी तिच्या जन्मापूर्वीच या दृष्ट चक्रात ओढली जाते. तिला देखील तिची इच्छा असो वा नसो या प्रथेचं पालन करावं लागत.    
मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक श्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी बाईच्या  शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पण या जीवघेण्या प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होत आहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाची आणि समाजाची उदासिनताही याला कारणीभूत आहे. त्यांचा निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आवश्यक असणार्या वैद्यकीय सुविधा, उदरनिर्वाहाच्या किमान गरजा तरी पूर्ण व्हायला हव्यात. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना नक्कीच मिळायला हवा. 

No comments:

Post a Comment

AIFF... सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा महोत्सव...

                सि नेमा... कथा, संगीत, अभिनय आणि तंत्रज्ञान  ही यातली काही ठळक घटक.  चित्रपटांना कोणी समाजाचा आरसा म्हणतो तर कोण...