तेरवं .. मी पाहिलेलं पहिलंच नाटक. यंदा महिलादिनानिमित्त एमजीएमजी च्या रुख्मिणी सभागृहात सक्षमा पुरस्कार सोहळ्यानंतर श्याम पेठकर लिखित व हरीष इथापे दिग्दर्शित तेरंव या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. एकल महिला असलेल्या शेतकरी वैशाली येडे यांच्यासह १३ महिला व त्यांच्या मुलींनी दमदार अभियनाद्वारे शेतकऱ्यांची परवड, एकल महिलांची होणारी परवड व त्यातून पुढे जाण्यासाठी केलेला यशस्वी संघर्ष मांडला.
या नाटकात शेतकऱ्यांच्या पाच विधवा आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त घरातील दोन मुली अशा सात जणी आहेत. ' समाज आणि सरकारपर्यंत एकल महिलांच्या समस्या, त्यांचा संघर्ष पोहोचावा; त्यांना त्यांचे अधिकार, हक्क मिळावे आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, सन्मानाचे जगणे त्यांच्या पदरात पडावे, हीच हे नाटक करण्यामागील भूमिका. विदर्भातील अशा एकल शेतकरी विधवा एकत्र येऊन आपल्या वेदना व दु:खाला थेट भिडल्या. त्यांनी मुक्या वेदना व पोरक्या दु:खालाही सोबत घेतले. परिणामी त्यातून जगण्याची तिरीप आत आली. नव्याने लढण्याची जिद्द जागी झाली.नवऱ्याच्या राखेतून या सगळ्या जणी फिनिक्ससारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या पंखात आता बळ येते आहे. घरांनी बंद केलेली दारे आता किलकिली होण्याची आशा आहे. वैराण आणि एकाकी आयुष्याच्या वाटेवर लढण्याची जिद्द प्रवाहित झाली आहे.‘तेरवं’ या अध्ययन भारती निर्मित, हरीश इथापे दिग्दर्शित आणि श्याम पेठकर लिखित नाटकात या मुक्या वेदनांना बोलतं करण्यात आलं आहे.
सतत सुरू असणारे दुष्काळाचे चक्रआणि त्यामुळे सर्वच हंगामात हाती आलेली नापिकी, गरजा भागण्यासाठी घेतलेल्या कर्जाची वाढत जाणारी रक्कम, निसर्गाच्या कृपेन आणि शेतकर्याच्या जिद्दीन हाती काही पीक आल तरी त्याला मिळणारा मातीमोल भाव, सतत होणारी अवहेलना यामुळे खचलेल्या असंख्य शेतकर्यांनी परिस्थिती समोर झुकत मरण्याचा पर्याय निवडला. त्यामुळं त्याची जरी यातून सुटका झाली असली, तरी त्यांच्यामागे राहणार्या बाईला आपल दुख पदरी बांधून आपल्या चिल्यपिल्यांसाठी खंबीर व्हावं लागलं. नवरा जारी सोडून गेला तरी त्याच्यामागे आपला संसार रेट्याने पुढे नेणार्या असंख्य स्त्रीया आहेत.
ज्या भारतीय समाजात बाईला साध्या साध्या हकांसाठी झगडाव लागत तिथे नवरा नसलेल्या या एकल स्त्रीयांना जगण्यासाठी मोठ दिव्यच कराव लागत. सासरी- माहेरी होणारी अवहेलना, एकटी बाई म्हणजे जणू आयती संधीच. असा समज असणार्या वासनेण बरबटलेल्या नजरा यासगळ्याला मात देत आपल्या लेकरांसाठी, स्वतच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणार्या एकल स्त्रीयांची कहाणी तेरवं या नाटकात मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नाटकात काम करणार्या एकल स्त्रीयांसोबत घडलेल्या खर्या घटनावरुण तेरवं हे नाटक साकारण्यात आलय. बाईला केवळ सहानुभूती, करुणा मिळवून देणारी ही कहाणी नसून, परिस्थितीला झुकवत तिने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे तेरवं......
No comments:
Post a Comment