Wednesday, February 5, 2020

AIFF... सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा महोत्सव...

                सिनेमा... कथा, संगीत, अभिनय आणि तंत्रज्ञान  ही यातली काही ठळक घटक.  चित्रपटांना कोणी समाजाचा आरसा म्हणतो तर कोणी व्हिज्युअलायझेशनचे प्रभावी माध्यम. प्रेक्षकाचे लक्ष वेधून कथेला जिवंत आभासी स्वरूप देणाऱ्या या माध्यमाचे वेड आबालवृध्द सगळ्यांमध्येच दिसून येते. सिनेमा केवळ मनोरंजनाचे माध्यम आता राहिले नसून, समाजाची चांगली- वाईट बाजू, संस्कृती, रोजच जगण, माणसातले माणूसपण आणि अमानुष वागण या सगळ्या पार्श्वभूमीच चित्रण सिनेमात करण्यात येते. 
त्यामुळेच विविध सामाजिक कंगोरे असणारे चित्रपट रसिकांना देश- विदेशातील जगण्याची कवाडे खुली करतात.  
              मनोरंजन अथवा इतर कोणत्याही बहाण्याने चित्रपट अनेक माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचतो पण तो काही निवडक रसिकांपुरताच मर्यादीत राहतो.  मात्र जगभरातील आशयसंपन्न चित्रपट  सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तो चित्रपट महोत्सवामुळे . यामुळे प्रेक्षकांची विचार करण्याची कक्षा तर रुंदावतेच मात्र अनुभवविश्व देखील तेवढेच समृद् होते. 
           जगभरातील चित्रपटांची रसिकांना ओळख करून देणारे चित्रपट जगतात मानाचे स्थान असणारे आणि सेलिब्रेटी स्टेट्स असणारे अनेक चित्रपट महोत्सव दरवर्षी जगभरात आयोजित करण्यात येतात. त्यात कान, बर्लिन, टोरोंटो या चित्रपट महोत्सवांना असणारे चंदेरी वलय अधिक आहे. हे झाले आंतरराष्ट्रीय मात्र देशपातळीवर देखील IFFI सारखे  महोत्सव आयोजित करण्यात येतात. मात्र हे महोत्सव मोठ्या शहरात होतात. लहान शहरात सिनेमाकडे आजही केवळ चैनीचे आणि मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहिले जाते. अशा शहरांमध्येही चित्रपटांविषयी  सकारात्मक आणि वैचारिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचे धाडस चित्रपटप्रेमी करत आहेत. एेतहासिक पर्यटननगरी अशी ओळख असणाऱ्या 
                औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षापासून औरंगाबाद  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच आयोजन करण्यात येत आहे. यशवंत चव्हाण प्रतिष्ठान,  नाथ ग्रुप आणि  एमजीएम संस्थेच्या सहकार्याने  आयोजित या महोत्सवाचे यंदा 7 वे वर्ष असून प्रादेशिक भारतीय भाषा,  इराणी, कोरियन  अशा विविध भाषेतील एकूण 40 चित्रपट दाखवण्यात  येणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे यात केवळ सिनेमा न दाखवता सिनेमा बघण्याचे तंत्र, दृष्टीकोन आणि  त्याच्या संकल्पनेवर चर्चा करणारी चित्रपट रसास्वाद कार्यशाळा आणि मान्यवरांतर्फे घेतले जाणारे मास्टरक्लास. चित्रपट महोत्सव आणि प्रेक्षक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे या कार्यशाळा. ही कार्यशाळा केवळ काही घटकांपर्यंत मर्यादित न ठेवता शहरातील बहुतांश महाविद्यालयात घेण्यात आल्यामुळे शहरातील तरुणाईचा सिनेमा बघण्याचा दृष्टीकोन  बदलतो आहे.  त्याचबरोबर दर्दी चित्रपटप्रेमी देखील घडण्यास यामुळे मदत होत आहे. 

Sunday, December 1, 2019

खरंच मी सुरक्षित आहे का?

 
जास्त वेळ बाहेर नको राहत जाऊ. काम झाल कि, लगेच घरी येत जा. आपण कितीही चांगल असलं तरी कोणाचा काही भरोसा नाही ग बाई.. 
     काल हैदराबाद मध्ये घडलेली घटना आईला सांगितल्या नंतर मला अपेक्षित असणार वाक्य कानी पडल. 
आता जास्त वेळ बाहेर नको राहत जाऊ म्हणजे नेमका किती आणि कोणता वेळ माझ्यासाठी सुरक्षित आहे? याचा अंदाज सध्या तरी मला आला नाही. कारण काही दिवसांपूर्वीच क्रांती चौक सारख्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा नको अशा प्रसंगाचा अनुभव आला. 
संध्याकाळी पावणेसातच्या दरम्यान कॉलेज मधून घरी शांततेत विचार करत पायी जात असताना, अचानक समोरुन गाडीवरून आलेल्या दोघांमधून एकाने " ऐ छीनाल आती क्या?" म्हणत माझ्या शांततेचा गळा घोटला. (घरी सत्यनारायनाच्या पूजेला येण्याचे निमंत्रण नव्हत हे.) त्याच क्षणी ज्यांचा अर्थ माहित आहे आणि नाही सुद्धा त्या सगळ्या शिव्या तोंडून बाहेर पडल्या. आणि अचानक कोणीतरी डिवचवल्याने आजूबाजूने जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला काय घडतय, याचा सहज स्पष्ट अंदाज येईल अशा आवाजात माझा राग मर्यादा ओलांडत होता. तरीदेखील त्या वेळी ना एखादी व्यक्ति थांबली ना कोणी काय होतय हे जाणून घेण्याची तसदी घेतली. 
     चढता आवाज आणि संताप बघत त्या दोघांपैकी एकाने 'जाने दो ना' म्हणत तिथून काढता पाय घेतला. 
आता नेमक काय जाऊ देऊ मी? माझी कोणतीही चुक नसताना ऐकाव्या लागलेल्या त्या शब्दांना?
 की केवळ वासना असणाऱ्या त्या नजरेला? 
  हा तोच क्रांती चौक होता जिथून अत्याचार पिडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न भुतो न भविष्यतो असा मोर्चा काढण्यात आला होता. आणि आज त्याच वरवर सुरक्षित वाटणाऱ्या माझ्या या शहरात रोज अशा प्रसंगांचा, चौका- चौकात होणारा त्रास, रिक्षावाल्यांची मग्रूरी, अश्लील शेरे, वासनेने डबडबलेल्या नजरांचा सामना अनेकिंना करावा लागतो. 
फक्त काही घडल्यावरच मेणबत्या घेऊन मोर्चे काढले, स्टेटस, प्रोफाईल मध्ये पीडितेचा फोटो ठेवला, RIP अन We want justice असे हैशटैग पोस्ट केले, की आपली जबाबदारी पार पडली अस समजायचे.  
  फाशी दया,भर चौकात जाळुन टाका यांना, चौरंगा करा, अशा अनेक मागण्या या दरम्यान करण्यात येतात. पण जिवानीशी मारल तर खरंच बलात्काराची मानसिकता देखील त्याच क्षणी मरण पावते का? 
कोणत्याही मुलीला तिच्या कुटुंबाला या मागण्या, मोर्चे नको तर केवळ उत्तर हवंय. घराबाहेर पडल्यानंतर तिला सुरक्षित वातावरणात जगता येईल का? 
घरी ती सुखरूप पोहचेल की तिच्या आई- वडिलांना कुठे एखाद्या कोपऱ्यात जळलेल्या अवस्थेत सापडेल?

Friday, September 27, 2019

पर्यटन: प्रवास नाविण्याचा.....


           
                 
            शांततापूर्ण बौद्ध वारसा स्थळांसाठी प्रसिद्ध असलेले औरंगाबाद शहर जगाच्या नकाशावर आशियातील वेगवान प्रगती करणारे शहर, मर्सीडीज गाड्यांचे शहर आणि एेतहासीक पर्यटननगरी म्हणून सर्वज्ञात आहे. सातवाहन-यादव राजवंश, मुहम्मद बिन तुघलक, अन् मुघल आणि नंतर निझाम अशा एकामागून एक अनेक राजवटींचा अंमल या शहरावर होता. इतिहास, परंपरा आणि आधुनिकता जेथे एकत्रित नांदतात ते शहर म्हणजे औरंगाबाद. जागतिक वारसाच्या स्मारकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अजिंठामधील रंगीत चित्रे, वेरूळमधील मूर्ती आणि एलिफंटा गुहेतील दैवी अवशेष पाहुन पर्यटक अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. अजिंठा-वेरुळच्या लेण्या म्हणजे महाराष्ट्राची गौरवस्थाने! अशीच अनेक वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन स्थळे या शहरात शतकानुशतके उभी आहे.
            आज 27 सप्टेंबरला  जागतिक पर्यटन दिन जगभर साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे यंदाचे यजमान पद भारताकडे देण्यात आले आहे. ‘पर्यटन आणि नोकरीः सर्वांसाठी चांगले भविष्य’ या थीमवर जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगानेच पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग या विषयावर विचार करने  गरजेचे ठरते. कधी एके काळी फक्त तीर्थयात्रा म्हणजेच पर्यटन असा समज असलेल्या भारतीय समाजात काळानुरुप झालेले अनेक बदल सहज दिसून येतात. पर्यटन क्षेत्रात येणारे नवनविन ट्रेंड आजचा युवक आणि सामान्य माणूस देखील चटकन आजमावून पाहत आहे. यात  अनेकांनी फिरण्याची आवड जोपासण्यासाठी आपल्या  स्थिर नोकरी वर् पाणी सोडत ट्रॅव्हलिंग सुरू केले आहे. आणि यात महिला देखील मागे नाही. गूगलवर सोलो फीमेल ट्रॅव्हलर्स असे सर्च केले तर जगभरातील असंख्य स्त्रीयांची नावे समोर येतील. स्त्रियांसाठी सुरक्षा ही अनेकदा मोठी चिंता असते. बर्‍याच जणींना स्वत:ची घरे सोडण्याची परवानगी नसते किंवा त्यांची भीती त्यांना अडवून ठेवते.  आणि एकट्या महिला प्रवाशांची कल्पना भारतीय समाजात आजही हास्यास्पद आहे. साध सासरहून माहेरी जायला देखील ज्या भारतीय संस्कृतीत बाईला अगोदर परवानगी घ्यावी लागते, त्या समाजातील मुली आता मात्र एकटीने सगळ जग अनुभवण्यासाठी  उंबरठा ओलांडत आहे. यात कधी चांगले तर कधी नकोसे अनुभव घेत ती स्वतः चे अस्तित्व शोधत ठाम भूमिका मांडत आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायात देखील म्हत्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन हा एक सेवा देणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. आणि यातील महिलाचे योगदान वाखान्याजोगे आहे. करिअरचे बरेच पर्याय जसे की आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळांवरील कस्टमर ग्राऊंड हँडलिंग (ग्राहक सेवा), टूर ऑपरेटर, इव्हेंट मॅनेजर, तिकीट अधिकारी, साहसी पर्यटन तज्ज्ञ, परिवहन अधिकारी, हॉलिडे कन्सल्टंट, लॉजिस्टिक, क्रूझ, एअरलाइन्स, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील हॉटेल्स आणि पर्यटन विभाग महिलांसाठी खुले आहेत.
             पर्यटन क्षेत्र हे केवळ संस्कृती,  रूढी- परंपरा आणि वास्तु यांच्याशी  निगडित राहत नाही. त्यापाठोपाठ रोजगाराच्या आणि विकासाच्या असंख्य संधी देखील उपलब्ध होतात. एक उद्योग म्हणून पर्यटन क्षेत्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत वेगाने प्रवास करीत आहे. विविध ठिकाणी आणि संस्कृतींमध्ये सहजतेने संवाद साधणारे लोकांमुळे जग एखाद्या खेड्याइतके संकुचित झाल्याचे चित्र आपण रोजच बघतो. पर्यटन हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा आणि वेगाने वाढणार्‍या उद्योगांपैकी एक आहे. त्याचे फायदे आणि आव्हाने ज्या सरकारने काळजीपूर्वक हातळल्या आहेत त्या राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि शैक्षणिक  स्तरातील बदल उघड्या डोळ्यांनी जगाने पाहिलेत. हे क्षेत्र फक्त एकाच स्वरुपातील काम आणत नाही. तर विविध उद्योगांची वाढ आणि विकास यामध्ये होतो. जसे की वाहतूक, निवास, वन्यजीव, कला आणि मनोरंजन. यामुळे नवीन रोजगार निर्मिती आणि परकीय चलन, गुंतवणूक आणि प्रदान केलेल्या वस्तू आणि सेवांच्या देयकामधून उत्पन्न मिळते.
              भारताच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटन क्षेत्राचे योगदान सध्या वाढत आहे. 2018 मध्ये देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) जवळपास २ बिलियन अब्ज डॉलर्स म्हणजेच एकूण 10 टक्के वाटा या क्षेत्राचा होता, असे स्टेटिस्टाच्या अहवालात म्हटले आहे. भारतातील रोजगारावरही या उद्योगाचा भरीव परिणाम होत आहे. 2016 मध्ये या क्षेत्राने  25..4 दशलक्षपेक्षा जास्त रोजगार थेट उपलब्ध करुन दिले. यामुळे  बेरोजगाराचे वाढते प्रमाण कमी होण्यास हातभार लागू शकतो. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत परदेशी पर्यटक आगमन  (एफटीए) ने  7.7% ची वाढ नोंदविली आहे. फेब्रुवारी 2019 मधील एफटीए फेब्रुवारी 2018 मधील 10,49,255 च्या तुलनेत 10,87,694 होता. परदेशी पर्यटकांची वाढती संख्या आनंदाची बाब असली तरी त्यांना स्वच्छ आणि  सुरक्षित  वातावरण आपण ठेवायला हवे. उगाच रस्त्यात कोणी गोरी बाई दिसली की तीला त्रास देण टाळलेल कधीही चांगलेच. 'अतिथी देवो भवो' या विचारांचे पालन करणाऱ्या संस्कृतीचा आपण भाग आहोत.
           पर्यटन हे फिरण्याचे आणि ९-५ या ठराविक वेळेला फाटा देणारे क्षेत्र आहे. यामुळे ज्या महिला अथवा मुलींना  मुळातच नवनविन जागांना भेट देण्याची, तिथली संस्कृती, रोजच जगण जाणून घ्यायला आवडत असेल त्यांनी नक्कीच याकडे करिअर च्या दृष्टीने बघायला हवे.  भारतातल्या लहान मोठ्या भागातून येणाऱ्या अनेक मुली या सोलो टुरिझम वा सोशल , एडवेंचर अशा अनेक प्रकारच्या पर्यटनाचा सुखद अनुभव घेत स्वावलंबी होत आहे. आपल्या शहरात देखील अनेक महिला ग्रुप अथवा एकट्याने देशविदेशातल्या पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. अशा ट्रिप्स मुळे  नेहमीच घर संसारात   स्वतःला बांधून घेणारया बाईला स्वतःला नव्याने शोधण्याची,  परखण्यची आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी साधता येते. तेव्हा तुम्ही कधी निघताय तुमच्या पहिल्या वहिल्या सोलो ट्रिप साठी.. 
पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया.
जयश्री शेळके. (प्रा. देवगिरी महाविद्यालय) 
धावपळीच्या जीवनात सुखाचा अनुभव घेण्यासाठी बाईने एकट्याने प्रवासाचा अनुभव नक्कीच घ्यायला हवा. 
देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना आमचा 9-10 महिलांचा ग्रुप एकत्र आला. यातील सर्वांनाच फिरण्याची आवड असल्याने आम्ही अगोदर जवळच्याच काही स्थळांना भेटी देन सुरू केले. गाडी ठरवणं, पैशांचा हिशोब बघन, हॉटेल्स च बूकिंग करण अशी एकएक काम करत हळूहळू पूर्णच टूरचे नियोजन आता आम्ही स्वतः करतो. या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे पर्यटनासाठी होणारा सगळा खर्च आम्ही स्व: कमाईतून करतो. आणि हे करताना आमचे कुटुंबिय खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. आता त्यांनाच सगळं इतक सवयीच झाली की ते स्वता आम्हाला आता कुठे जाणार, अशी विचारणा करतात. आम्ही केवळ धार्मिक यात्रांना जात नाही तर निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध स्थळांकडे आमचा कल असतो. ज्या महिला कधीच घराबाहेर पडल्या नाही, त्या  आता घराबाहेर पडताय, जग नव्याने बघताय. आणि यामुळे ती स्वच्छंदी होतीय. आम्ही सर्व महिलांच ग्रुप मध्ये असलो तरी, कुठेही फिरतांना, रात्रीचा प्रवास करताना आम्हाला वाईट अनुभव आजपर्यंत तरी आलेला नाही. कुठेही फिरतांना अनुभवलेले विविध क्षणच जगताना दिशादर्शक ठरतात. 
माया नरसापूर. (मेकॅनिकल इंजीनियर, जॅपनीज इंटेर्प्रेटर-गाइड)                                                       
भाषांतर करणारी अनेक साधने उपलब्ध असली, तरी प्रभावी संवादासाठी भाषेचे  ज्ञान असणे महत्त्वाचे.. 
औरंगाबादला अजिंठा- वेरूळ अशी बुद्धाशी निगडीत पर्यटन स्थळे असल्यामुळे येथे जपान मधून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. जॅपनीज भाषेला त्यामुळे इथे मोठा वाव आहे.  इतरांना ही भाषा शिकवताना मी टुरिस्ट गाइड च कोर्स केला. आणि 2005 पासून मी शहरातील एकमेव महिला गाइड म्हणून काम सुरू केल आहे. ८० वर्षापेक्षाही जास्त वयाच्या एका जोडप्यासोबत काम करताना मला कळाल की ते दोघांनीही वयाच्या ८०व्या वर्षी माऊंट एवरेस्ट सर करण्याचा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला आहे. एकल महिला गाइड अथवा इंटरप्रीटर म्हणून काम करताना कोणताही वाईट अनुभव मला कधी आला नाही. अगदी जपानला देखील मी एकटी जाऊन आलीय. तिथे सुद्धा  नकारात्मक अनुभवला सामोरे जावे नाही लागले. आणि फिरण्याची आवड असणार्‍या  तरुणांनी खास करून मुलींनी देखील या क्षेत्रात यायला हव. घर बसल्या सगळ्या जगाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. 
दीपा खेकाळे (प्रा. देवगिरी महाविद्यालय) 
कुशल अथवा अकुशल दोघांनाही रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे टुरिझम.. 
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन हा विषय शिकवताना एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली ती म्हणजे, ज्या मुलांना या क्षेत्रात आवड आहे त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळाले तर ती स्वतः नवनविण कल्पना पुढे आणून त्यावर चांगलं काम करतात. त्यांना कोणत्याही मर्यादा राहत नाही. आणि हे क्षेत्र असे आहे जिथे कुशल व अकुशल दोन्ही मनुष्यबळाला सहज काम मिळवून देते.  औरंगाबाद हे खूप मोठ पर्यटन स्थळ असले तरी सध्या मात्र इथले टुरिझम कुठेतरी मागे पडल्याचे जाणवते. पूर्वी सीजन मध्ये जसे खूप फॉरेन टुरिस्ट दिसायचे तसे आता क्वचितच एखादा दूसरा पर्यटक दिसतो. यासाठी आपण केवळ व्यवस्थेला जबाबदार नाही ठरवू शकत. आपण देखील स्वता: हुन पुढाकार घेत इथल्या पर्यटन स्थळांची होणारी दुरावस्था  थांबवायला हवी. 
उल्का जोशी. (सायली संजय पिले). 
शहरातील पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी एअर कनेक्टीविटी  महत्त्वाची. 
आमचे  स्वतःचे  टुरिस्ट हँन्डीक्राफ्ट चे शॉप रेल्वे स्टेशन   होते. इथे येणार्‍या पर्यटकांना बघून त्यांच्यासाठी काही करता यावे, त्यांना अजून काही चांगलं देता यावे, ही भावना पर्यटन क्षेत्रात येण्यास कारणीभूत ठरली. आणि खर तर माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या एका तरी मुलीने पर्यटन क्षेत्रात काम कराव. मुख्य म्हणजे मी 11वी पासून तर पीजी पर्यतंच सगळ शिक्षण हे टुरिजम मध्येच घेतल आहे. 12वी च्या सुटयांमध्ये काही कराव या हेतूने मी प्रसन्न होलीडेज मध्ये पार्टम करण सुरू केल. आणि त्यानंतर आता 2014 मध्ये अस्सिटन्ट ब्रांच मॅनेजर म्हणून काम केल. आणि आता काही कारणांमुळे मी नौकरी करू शकत नसले तरी काम करताना ग्राहकाशी जपलेल्या  नात्यामुळे अजूनही मी त्यांचे टूर प्लॅन बनवून द्यावेत अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे मी आता टूर प्लॅन बनवून देण्याच काम करते. आणि जे लोक बाहेरच्या देशात जाऊ इच्छिता त्यांना मी आवर्जून सांगते, की अगोदर आपला विविधतेन नटलेला भारत देश बघा. जगाच्या नकाशावर औरंगाबाद आकर्षणाच केंद्रबिंदू आहे. मात्र याविषयी जागरूकता निर्माण करणे. आणि कनेक्टिविटी वाढवण्यावर भर द्यायला हवी.

Sunday, April 7, 2019

निवडणुका आणि मतदान...

           

     निवडणुका या लोकशाहीचा मुख्य घटक. त्यातच भारतातील निवडणुका या एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नसतात.  २०१९ हे वर्ष चालू झाल्यापासूनच देशभरातील सगळ्यांचेच लक्ष निवडणुकांकडे लागले होते. अशातच  मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी १० मार्चला  पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. ही घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू  झाली. पण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात काय करावे आणि काय करू नेय, म्हणजेच आचारसंहिता. मतांसाठी लोकांना पैसे वाटणेअनेक पक्षांच्या युती महाआघडी, गठबंधन सुद्धा झाले. निवडणुका म्हटल्या की पक्षांतरही ओघाने आलंच. त्याला अनेक पैलू आणि कारणं आहेत. ही पक्षांतरं कधी अपेक्षित तर कधी धक्कादायक असतात. सर्वच पक्षात उमेदवारांच्या आउटगोइंग/ इनकमिंग च वेग वाढला. तोही एवढा की आज दिवसभरात कोण पक्षांतराची तयारी करतय यावर कट्या कट्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडिया, वर्तमानपत्र, न्यूज चॅनल्स वर निवडणुकांचीच चर्चा जोरात चालूय. सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार मतदान करतील.  2014 च्या तुलनेत यंदा 7 कोटी मतदार वाढले आहेत. अठरा-एकोणीस वर्षांचे दीड कोटी मतदार यंदा पहिल्यांदाच मतदान करतील. 8 कोटी 43 लाख नवीन मतदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.यंदा 10 लाख पोलिंग बूथ स्थापन केले जातील.  2014 साली पोलिंग स्टेशनची संख्या 9 लाख होती.  प्रत्येक पोलिंग बूथवर EVM चा दुरुपयोग टाळण्यासाठी VVPAT चा यंदा प्रथमच  वापर केला जाईल.  मतदानाचा आकडा वाढावा याकरिता मतदारांमध्ये जागरूकता देखील केली जात आहे. मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने अप्स, हेल्पलाइन नंबर प्र्सिद्ध केले आहेत    महागड्या वस्तू देणे, मतदारांना अमिष दाखवणे, लालूच दाखवणं अशा गोष्टी आचारसंहितेत बेकायदेशीर ठरतात. आणि या सर्व बाबी मतदारांनी देखील टाळायला हव्यात. तसेच मतदानाचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस हा विचार बाजूला करून मतदानदिन हा आपला अधिकार बजावण्याचा दिवस आहे हे लक्षात घ्यावं.  ५ वर्षातून एकदा मतदनाचा अधिकार आपल्याला बजवता येतो. आणि यावरूनच देशाचे पुढील राजकीय भविष्य ठरते. तेव्हा कोणत्याही आमिषाला, तसेच जाती-पातीच्या राजकरणाला बळी न पडता सजगतेन मतदान करायला हव.

पडद्यावरील ती.

                   १९०० च्या सुमारास दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळकेंच्या  मोहिनी भस्मासुर (1 913) या चित्रपटात पार्वतीची भूमिका केली. आणि तेव्हापासून भारतीय सिनेमात स्त्रीचा प्रवेश झाला. प्रामुख्याने हीरोच्या मागे पुढे फिरणारे, शोषिक, धार्मिक, तथा देवत्व बहाल केलेले पात्र आजदेखील अभिनेत्रीसाठी साकारले जाते. झीरो फिगर , तारुण्य आणि गोरेपणा ही जणू अभिनेत्रीसाठी तयार केलेली एक चौकट आहे. पडद्यावर दिसणारी बाई ही गोरीच हवी, अमुक-तमुक साइज मधेच तिचा बांधा असायला हवा, साचेबद्ध दृष्टीतून अभिनेत्रीकडे पाहिजे जाई. आणि अजून देखील पहिले जाते.

हे झाले सिनेमाचे पण घराघरात असणार्‍या टीव्ही वर येणार्‍या जाहिरातींमध्ये देखील असेच काहीसे चित्र दाखवण्यात येते. आजदेखील गृहूपयोगी वस्तूंच्या जाहिरातीमध्ये बाईलाच एक वस्तु म्हणून सादर केल जात. सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीतून गोरा रंग कसा महत्वाचा आहे हे दाखवताना स्त्रीच्या सुंदरतेला ठराविक साच्यात बसवलं जात. आणि याचा परिणाम समाजावर कसा होतो हे आपल्याला सगळीकडेच दिसून येते. ही झाली नाण्याची एक बाजू. जस इतर क्षेत्रात स्त्रीया आपल कर्तुत्व सिद्ध करत आहे तसच चित्रपट सृष्टीत देखील बदलाचे वारे वाहन सुरू झालय. महिला आधारित चित्रपटांचे प्रमाण वाढले असून १०० कोटींचा आकडा देखील गाठत आहेत. सौंदर्याच्या ठराविक चौकटी मोडून अनेक अभिनेत्र्यांनी आपल्या विचारांनी, अभिनयाने सिनेरसिकाला प्रभावित केले आहे. तसेच अनेक उत्पादनांच्या जाहिरातीतून सकारात्मक बाजू मांडण्यात येत आहे. बाई केवळ शोभेची बाजू नसून तिच्यातल्या इतर गुणांचाही विचार या अनुषंगाने केला जातोय. या बदलातून समाजाची बंदिस्त मानसिकता नवा आकार घेऊ पाहत आहे. पडद्यावरील स्त्री जेवढी जुन्या विचारातून मुक्त होतीय तेवढीच पडद्यामागील स्त्री देखील मुक्त होण्यासाठी वाटचाल करत आहे.

देवदासी... की भोगदासी?


                      भावीण, बसवी, ‘जोगतिणी, मुरळी आणि देवदासी अशा अनेक नावानी देवाची सेविका अथवा पत्नी म्हणून जीवन जगणाऱ्या बाईला ओळखले जाते. जेव्हा संस्थानं, राजवाडे अस्तित्वात होती तेव्हा त्यांच्या भागातील मंदिरांना ठराविक रक्कम वा जमिनी खर्चासाठी दिल्या जाई. तसेच त्या मंदिरात सेवा करणाऱ्या स्त्रीया या नाच- गाणे यात देखील निपुण होत्या. देवाच्या नावाखाली तेव्हा सुद्धा त्यांना राजे-महाराजे तथा धनिकाकडून उपभोगलं जाई.     
प्राचीन काळापासून सुरु असलेल्या या प्रथेचे प्रमाण काही अंशी कमी झालं असलं तरी आजतागायत हि प्रथा सुरूच आहे.  आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात.रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळय़ा वाहिल्या जातात.  बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे डोंगरावर यल्लम्मा देवीचं मंदिर आहे. आणि याच  यल्लम्मादेवीच्या जत्रेत देवदासीपणाची दीक्षा दिली जाते. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक मार्गशीर्ष पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या काळात देवीच्या दर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला ‘रांडाव पुनव’ तर पौष पौर्णिमेला ‘आहेव पुनव’ म्हणतात. शिवाय चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा असते. ती १५ दिवस चालते. या काळात यल्लम्माला सोडलेल्या जोगतिणी आणि जोगते (पुरुष) विशिष्ट कर्मकांड पार पाडत असतात. तसेच याच  यल्लम्मा देवीसमोर नग्नपूजेची अघोरी प्रथादेखील पाळण्यात येते.   मुला-मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट . मुलां-मुलींना  खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळय़ा बनवतात. आई-वडिलांनी देवाला मागितलेला नवस पूर्ण झाल्यानंतर मुलीला देवाला सोडले जाते, किंवा देवासोबत तिचे लग्न लावून दिले जाते. जास्त गाजावाजा न होता , एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. त्यानंतर आयुष्यभर त्यांना तसेच राहावे लागते. या दरम्यान त्यांचे शारीरिक शोषण आणि त्यांच्यावर अत्याचार होत असतात. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी ही पैसा कमविण्याची एक संधी या गरीबांना मिळते. त्यामुळे  ही अंधश्रद्धा इथे असली तरी खरं कारण हे आर्थिक आहे.
देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं.  देवदासी प्रथेमध्ये मुलीला वयात येण्यापूर्वी देवाला सोडून कोवळय़ा वयातच त्यांचे भवितव्य ठरविले जाते. तेही तिच्या जन्मदात्याकडूनच ! विशेष म्हणजे  ज्या ठिकाणी अशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी त्याचे प्राबल्य जास्त जाणवते. देवदासी प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. दारिद्रय़ात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचणार्या दलित देवदासी कोणतीही तक्रार न करता उत्सवात भाग घेतात. त्याबद्दल त्यांना मिळणारी साडीचोळी, नारळसुपारी यातच त्या समाधान मानतात.देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिच्यापुडे येत.  स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही. या प्रथेस धार्मिक आणि सामाजिक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसते.
देवदासी प्रथेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आजपर्यंत अनेकवेळा आवाज उठविला याचे मुख्य कारण म्हणजे या अनिष्ट प्रथेमुळे वेश्या व्यवसायाला खतपाणी तर मिळतच पण त्यासोबतच स्त्रीयांची कुचंबणा देखील होते. विसाव्या शतकात त्याविरुद्ध अनेक लढे झाले, चळवळी झाल्या तरी तिचे समूळ उच्चाटन झालेले नाही. अनेक आंदोलनानंतर कर्नाटक सरकारने 1982 आणि आंध्रप्रदेश सरकारने 1988 मध्ये ही प्रथा बेकायदेशीर ठरवली. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील स्वरुप जरी बदललेले असले तरी मूळ प्रथेशी निगडित जे उत्सव अथवा प्रथा आणि परंपरा आहेत त्या तशाच आहेत. शिवाय मुक्त झालेल्या देवदासींच्या शिक्षणाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्नही जटिल असतो. उपजीविकेचे स्थिर साधन मिळाले नाही तर या स्त्रिया पुन्हा त्याच मार्गाला लागण्याचा धोका असतो. 
आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दीक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने गलिच्छ दरीत दूर लोटून देते ती परत कधीही वर न येण्यासाठी ! आणि हे चक्र इथेच थांबत नाही, तर सुरू होते. एखाद्या घरात ही प्रथा सुरू झाल्यावर त्यात खंड पडू दिला जात नाही. आणि देवदासी असणार्‍या बाईला होणारी मुलगी तिच्या जन्मापूर्वीच या दृष्ट चक्रात ओढली जाते. तिला देखील तिची इच्छा असो वा नसो या प्रथेचं पालन करावं लागत.    
मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक श्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी बाईच्या  शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पण या जीवघेण्या प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होत आहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाची आणि समाजाची उदासिनताही याला कारणीभूत आहे. त्यांचा निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आवश्यक असणार्या वैद्यकीय सुविधा, उदरनिर्वाहाच्या किमान गरजा तरी पूर्ण व्हायला हव्यात. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना नक्कीच मिळायला हवा. 

तेरवं... एकल स्त्रीयांची कहाणी.

तेरवं .. मी पाहिलेलं पहिलंच नाटक. यंदा महिलादिनानिमित्त एमजीएमजी च्या रुख्मिणी सभागृहात सक्षमा  पुरस्कार सोहळ्यानंतर श्याम पेठकर लिखित व हरीष इथापे दिग्दर्शित तेरंव या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. एकल महिला असलेल्या शेतकरी वैशाली येडे यांच्यासह १३ महिला व त्यांच्या मुलींनी दमदार अभियनाद्वारे शेतकऱ्यांची परवड, एकल महिलांची होणारी परवड व त्यातून पुढे जाण्यासाठी केलेला यशस्वी संघर्ष मांडला.
या नाटकात शेतकऱ्यांच्या पाच विधवा आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त घरातील दोन मुली अशा सात जणी आहेत. ' समाज आणि सरकारपर्यंत एकल महिलांच्या समस्या, त्यांचा संघर्ष पोहोचावा; त्यांना त्यांचे अधिकार, हक्क मिळावे आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, सन्मानाचे जगणे त्यांच्या पदरात पडावे, हीच हे नाटक करण्यामागील भूमिका.  विदर्भातील अशा एकल शेतकरी विधवा एकत्र येऊन आपल्या वेदना व दु:खाला थेट भिडल्या. त्यांनी मुक्या वेदना व पोरक्या दु:खालाही सोबत घेतले. परिणामी त्यातून जगण्याची तिरीप आत आली. नव्याने लढण्याची जिद्द जागी झाली.नवऱ्याच्या राखेतून या सगळ्या जणी फिनिक्ससारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या पंखात आता बळ येते आहे. घरांनी बंद केलेली दारे आता किलकिली होण्याची आशा आहे. वैराण आणि एकाकी आयुष्याच्या वाटेवर लढण्याची जिद्द प्रवाहित झाली आहे.‘तेरवं’ या अध्ययन भारती निर्मित, हरीश इथापे दिग्दर्शित आणि श्याम पेठकर लिखित नाटकात या मुक्या वेदनांना बोलतं करण्यात आलं आहे. 
सतत सुरू असणारे दुष्काळाचे चक्रआणि  त्यामुळे सर्वच हंगामात हाती आलेली नापिकी,  गरजा भागण्यासाठी घेतलेल्या कर्जाची  वाढत जाणारी रक्कम, निसर्गाच्या कृपेन आणि शेतकर्‍याच्या जिद्दीन  हाती काही पीक आल तरी त्याला मिळणारा मातीमोल भाव, सतत होणारी अवहेलना यामुळे खचलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी परिस्थिती समोर झुकत मरण्याचा पर्याय निवडला. त्यामुळं त्याची जरी यातून सुटका झाली असली, तरी त्यांच्यामागे राहणार्‍या बाईला आपल दुख पदरी बांधून आपल्या चिल्यपिल्यांसाठी खंबीर व्हावं लागलं. नवरा जारी सोडून गेला तरी त्याच्यामागे आपला संसार रेट्याने पुढे नेणार्‍या असंख्य स्त्रीया आहेत. 
ज्या भारतीय समाजात बाईला  साध्या साध्या हकांसाठी झगडाव लागत तिथे नवरा नसलेल्या या एकल स्त्रीयांना जगण्यासाठी मोठ दिव्यच कराव लागत. सासरी- माहेरी होणारी अवहेलना, एकटी बाई म्हणजे जणू आयती संधीच. असा समज असणार्‍या वासनेण बरबटलेल्या नजरा यासगळ्याला मात देत आपल्या लेकरांसाठी, स्वतच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणार्‍या एकल स्त्रीयांची कहाणी तेरवं  या नाटकात मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नाटकात काम करणार्‍या एकल स्त्रीयांसोबत घडलेल्या खर्‍या घटनावरुण तेरवं हे नाटक साकारण्यात आलय. बाईला केवळ सहानुभूती, करुणा मिळवून देणारी ही कहाणी नसून, परिस्थितीला झुकवत तिने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे तेरवं......



AIFF... सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा महोत्सव...

                सि नेमा... कथा, संगीत, अभिनय आणि तंत्रज्ञान  ही यातली काही ठळक घटक.  चित्रपटांना कोणी समाजाचा आरसा म्हणतो तर कोण...